समृद्धी महामार्गावर ३५ लाखांचा गुटखा जप्त

Foto
जयपूर टोलनाक्याजवळ २० लाखांचा ट्रकही पकडला; दोघे ताब्यात

छत्रपती संभाजी नगर, (प्रतिनिधी) : समृद्धी महामार्गावरून अमरावतीहून छत्रपती संभाजीनगरकडे अवैधरीत्या वाहतूक केला जात असलेला प्रतिबंधित गुटखा व सुगंधित पानमसाला करमाड पोलिसांनी जप्त केला. जयपूर टोलनाका एक्झिट पॉईंटजवळ बुधवारी (दि. ३०) पहाटे केलेल्या कारवाईत ३५ लाख १९ हजार रुपयांचा गुटखा पानमसाला आणि २० लाखांचा आयशर ट्रक, असा एकूण ५५ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी इस्माईल खैराती शेख (३६) व अकिल खलील शेख (३६) यांना ताब्यात घेण्यात आले. सहाय्यक पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांना अमरावतीहून गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी जयपूर टोलनाक्याजवळ सापळा रचला. 

पहाटे साडेपाचच्या सुमारास आयशर ट्रक (एमएच ४६ बीएफ ४२३५) येताना दिसताच पोलिसांनी तो थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने ट्रक वेगाने पळवून नेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून ट्रक अडविला. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये ठजधअङ इडएछुए बाजीराव सुगंधित पान मसाल्याचे १५ हजार ३०० पुढे (३० लाख ६० हजार रुपये) आणि मस्तानी गुटख्याचे १५ हजार ३०० पुडे (४ लाख ५९ हजार रुपये) आढळले.

पोलिसांच्या चौकशीत हा माल अमरावतीतील जावेद हारुण मेमन याच्याकडून घेतल्याचे आणि छत्रपती संभाजीनगरातील अंजिठा किराणा स्टोअर्सचे मालक सय्यद वाजेद सय्यद फारुख यांच्या सांगण्यावरून वाहतूक केल्याचे ताब्यात घेतलेल्या संशयितांनी सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले. या प्रकरणी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम-२००६ अंतर्गत करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकूर करीत आहेत.

-- कारवाई करणारे पथक असे -- 
ही कारवाई पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत स्वामी व उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांच्या पथकाने केली. कारवाईत सहाय्यक पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकूर, पोहेकॉ शिवाजी मदेवाड, अरुण राघुडे, जयसिंग नांगलोत, शत्रुघ्न मडावी, रामेश्वर खंडागळे, कपूर चव्हाण, अमित वाधिरे, राजू महेर आदीनी सहभाग घेतला.